Sunday, December 19, 2010

आम्ही पुण्याचे बामन हरी....

आजपर्यंत मी अनेक नाटकं, सिनेमा पाहीले, मात्र त्याविषयी काय वाटते हे जरी आप्तेष्ट मंडळींशी बोललो, तरी कुठे लिहिले वगैरे नाही. कारण म्हणजे आपण आपले मत व्यावसायिक समीक्षक अथवा साहित्यिक जसे मांडतात तसे मांडू शकू की नाही हा एक हास्यास्पद विचार...! खरं बघितलं तर मला काय वाटते हे याआधीच लिहायला पाहिजे मात्र वरील काही विचार आणि या माध्यमाची माहिती नसणे यामुळे काही लिहिले नाही. कधीतरी निवांत पुन्हा वाचायला हे बरे आहे, कारण वहीत लिहिले तर ती नाहीशी होण्याचा अधिक संभव!! आणि नाही झाल्या तरी लिहिण्याचा कंटाळा...असो.
तर आज दि.१९/१०/२०१० रोजी म्हणजे रविवारी मेघराजराजे भोसले यांची पांडव आणि वैभव जोशी यांची नलीनोत्तम अशी पांडव नलीनोत्तम निर्मित आणि विजय गोविंद दिग्दर्शित भारतीय नाट्यसृष्टीत मैलाचा दगड ठरणारे विजय तेंडूलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' हे नाटक पाहण्याचा, आणि ते देखील पहिला दिवस आणि पहिला शो! खरे पाहता आमच्या सारख्या किंवा आजच्या पिढीला हे नाटक उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे प्रथम अभिनंदन! कारण हे आणि सुनील बर्वे जसे आता हर्बेनीयम च्या माध्यमातून जसे जुनी गाजलेली नाटके घेऊन येत आहेत ती एक मेजवानीच आहे! असो.
 

   .
तर मी आधी या नाटकाची संहिता वाचली होती, मात्र पाहीले नव्हते. त्यात तेंडुलकरांनी हे अनैतिहासिक असल्याचे सांगून टाकले आहे! कारण माझ्यामते हे नाटक सदा सर्वकालिक अशा प्रवृत्तीचे आहे. त्यात त्यामधील प्रसंग इतिहासात घडले, अथवा नाही याची चर्चा माझ्या दृष्टीने गौण आहे, कारण मी ते एक संपूर्ण कलाकृती म्हणून पाहतो!

यात ब्राह्मण विरोधी असे काही प्रथमदर्शनी तरी काहीच नाही, कारण ज्या काळात सत्ता आणि सत्ताकेंद्रे ज्यावेळी ब्राह्मण समाजाच्या पूर्णत: हातात होती, तिथे 'बावनखणी' काही वावगी वाटत नाही. किंबहुना या बावनखणी च्या अनुषंगाने कोणी असा गैरसमज करून घेता कामा नये की नाना जसे अत्यंत स्त्रीलंपट रंगवण्यात आले (कदाचित असतीलही) तसे त्यांच्या राजकारणातील दारा-याकडे दुर्लक्ष होता कामा नये. नानाने दिलेला हार ती वारांगना घाशिरामाकडून हिसकावून घेते, आणि त्यास चोर समजून शिपाई चोप देतात, त्यानंतर आपली मुलगी नानाच्या तैनातीत ठेवून नाना आपल्या पदरी कोतवाली पाडून घेतो आणि शहरात कायदा सुव्यवस्था याचे अवाजवी प्रस्थ माजवतो त्यात प्रस्थापित ब्राह्मण समाजावर अन्याय होत असे, त्यानंतर त्यास कळते की त्याची मुलगी एका सुईणीच्या घरी आहे, तो तिथे जातो, तो ती मृत असते, तिला पुरून टाकण्यात आले असते. त्यानंतर घाशीरामच्या वागण्याचा तोल जातो आणि तो मनमानी वागू लागतो...आणि एके दिवशी कांही तेलंगी ब्राह्मण त्याच्या तावडीत सापडतात...तो त्यांस कोठडीत डांबतो आणि पुरेशी हवा तिथे नसल्याने त्यातील २२ ब्राह्मणांचा घुसमटून मृत्यू होतो आणि नंतर ज्याप्रकारे पुण्यातील संतप्त ब्राह्मण श्रीमंताकडे चालून येतात आणि आता स्वतः नानास देखील डोईजड झालेला घाशीराम यास नाना त्या ब्राह्मणांच्या हवाली करतात, आणि हत्तीच्या पायाला बांधून शेंदूर फासून, डोई भादरून गावभर फिरवून शेवटी दगड मारून त्याचा बळी घेतला जातो.
वास्तविक अतिशय छान संगीतमय प्रकारे हा घटनाक्रम या नाटकात सांगितला जातो. त्यात कोठेही कंटाळवाणे वाटत नाही आणि माझ्यामते हेच नाटकाचे यश आहे..
 
श्री गणराय नर्तन करी  
आम्ही पुण्याचे बामन हरी....